परभणी येथे ‘शासन आपल्या दारी’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती

परभणी : परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात ‘अमृत’ योजनेतून भूयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांनी आज दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आज ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार हेमंत पाटील, आमदार  विक्रम काळे, अब्दुल्लाह खान अ. लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी, विप्लव बाजोरिया, मेघना साकोरे-बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, माजी मंत्री अर्जून खोतकर, विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलीस अधीक्षक रागसुधा आर, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर (Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar, MP Hemant Patil, MLA Vikram Kale, Abdullah Khan A. Latif Khan aka Babajani Durrani, Biplav Bajoria, Meghna Sakore-Bordikar, Suresh Varpudkar, Ratnakar Gutte, Balaji Kalyankar, Former Minister Arjun Khotkar, Divisional Commissioner Madhukar Rajeardad, Collector Raghunath Gawde, Chief Executive Officer of Zip Vinay Moon, Superintendent of Police Ragsudha R, Municipal Corporation Commissioner Tripti Sandbhor) आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना, सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.

परभणीसाठी आपले सरकार आता पर्वणी म्हणजे सुवर्णसंधी घेऊन आले आहे. विकास केवळ मुंबई – पुणे – नागपूर एवढाच मर्यादित असता कामा नये, तो चौफेर असला पाहिजे म्हणूनच अगदी गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही. राज्याचा समतोल विकास झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करीत आहोत, असे सांगून ‘शासन आपल्या दारी’ ही या देशातील क्रांतीकारी योजना ठरत आहे. करोडो रुपयांचे लाभ देऊन या अभियाने देशात विक्रम केला असून आतापर्यंत १ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यात ८.७५ लाख लाभार्थ्यांना लाभ
एकट्या परभणी जिल्ह्यात ८ लाख ७५ हजार लाभार्थ्यांची नोंदणी केली आहे, त्यांना सुमारे १ हजार ४६४ कोटींचे लाभ आपण देत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थ्यांना 22 हजार ट्रॅक्टर, 4 हजार पॉवर टिलर, 22 हजार 500 रोटाव्हिटर तसेच 4 लाख लाभार्थ्यांना 1351 कोटी रुपयांचा लाभ डिबीटीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीपाचे पिक धोक्यात आले आहे. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, काळजी करु नका, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत अजून ६ हजार रुपयांची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना राज्याने सुरु केली असून आता पात्र शेतकरी लाभार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना विविध पिकांचा केवळ एका रुपयात विमा काढून भविष्यात येणाऱ्या आपत्तींपासून संरक्षित केले आहे. महिलांना महिला बचतगटाच्या माध्यमातून अर्थिक मदत करुन महिलांचे शक्तीगट तयार करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. राज्य शासनाने 75 हजार नोकऱ्या देण्याचे जाहीर केले होते. परंतू प्रत्यक्षात दीड लाखापेक्षा जास्त नोकऱ्या देण्याचे काम सुरु आहे. ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम हे सरकार करीत असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे शासन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून राज्याचे सरकार आपल्या सेवेत आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे ‘शासन आपल्या दारी अभियान’ आहे. ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे, तिथे सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मराठवाड्याला दर चार ते पाच वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना तयार केली आहे. सरकारने यासाठी केंद्र सरकारला विनंती केली असुन, यासाठी निधी मिळेल असे सांगून, पश्चिमी वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे सांगून मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागू नये, यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. निम्न दुधना प्रकल्पासाठी तसेच इतर प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून देखील पाण्याचा थेंब-थेंब वाचवून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ मार्ग करण्यात येणार असून, त्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचे भाग्य उजळणार आहे. परभणी शहरातील रस्ते विकासासाठी तसेच रस्त्याला काँक्रिटमध्ये परिवर्तित करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बारव संवर्धन मोहीमेचे कौतुक केले.

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना, एक रुपयात पीक विमा या महत्वाच्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात 7 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बारा महिने वीज उपलब्ध करुन देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत तर ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करुन दिली आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

संजय गांधी निराधारसारख्या विविध योजनांमध्ये मानधनात वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत देखील वाढ केली असून, गरीबांसाठी घरे बांधणीचे काम देखील मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. शबरी, रमाई योजने अंतर्गत घर योजना व्यापक प्रमाणात राबवून बेघरांना घर उपलब्ध करुन देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे. या योजनेतून जेवढी घरे मागाल तेवढी घरे देण्याचे काम शासन करणार आहे. परभणी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्र शासनाने गतीने निर्णय घेतला. राज्य सरकारने राज्यात एका वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे  फडणवीस यांनी सांगितले.

सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील शेतकरी कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून सर्वांचा विकास करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य शासन काम करत असून, सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुढील महिन्यात शासन स्तरावर विभागीय आढावा बैठक घेण्यात येणार असून, लवकरच राज्य शासनाकडून मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाबाबत योग्य निर्णय घेण्यात येतील, शेतकऱ्यांबाबतही ठोस महत्वाचे निर्णय घेण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. परभणी जिल्ह्याला ऐतिहासिक प्राचिन वास्तूंचा मोठा वारसा लाभला असून, त्यांच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या कामासाठी सर्वजण पुढे याल, असा विश्वास व्यक्त करुन राज्यात ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांचे शासकीय कार्यालयातील होणारे हेलपाटे, वेळ आणि पैसाही वाचत असून, हा कार्यक्रम राज्यभर लोकप्रिय होत असल्याचे  पवार यांनी सांगितले.

राज्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडला असून, राज्य शासन आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. राज्यातील पीक परिस्थितीबाबत नुकताच व्हीसीद्वारे आढावा घेतला असून, त्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. पावसाच्या मोठ्या खंडामुळे राज्यातील धरणातील जीवंत पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असून, पाणी वापराबाबतचेही नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यात पावसाळ्याचे अजून काही दिवस बाकी असल्याचे सांगून ते म्हणाले की, सध्या मराठवाड्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे. पाणी वापराचे योग्य नियोजन करून नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी वनविभागाने गवताचा लिलाव न करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची संकल्पना विशद करुन लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली.प्रास्ताविकात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गंत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ
यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये तृतीयपंथीयांना ओळखपत्र, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना, कृषी यांत्रिकीकरण, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र, कर्मवीर दादासाहेब सबळीकरण व स्वाभीमान योजना, रमाई घरकुल योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, शबरी आवास योजना, वैयक्तीक शौचालय अनुदान, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, वैयक्तीक कर्ज परतावा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या योजनाचा यावेळी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.