संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा पोलिसांना चकवा;  पोलिसांच्या हातावर तुरी देत झाले गायब 

मुंबई – जिथे जिथे भोंग्यावरून (Loudspeaker) बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa)  पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray)  यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटलं आहे.राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असताना मनसेचे नेते पोलिसांना गुंगारा देत आहेत. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली आणि गायब झाले.

नेमकं काय आहे प्रकरण ? 

मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर (Shivteerth Residence) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली.