‘आपण फक्त निषेधाचे खलिते पाठवतो, अजित पवारांनी निषेध केला तेवढ्याने चालणार नाही’

नवी दिल्ली : सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात कन्नड भाषकांची अरेरावी पुन्हा दिसून आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर हल्ला करत काळी शाई फेकण्यात आली. एका महामेळाव्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून हल्ला केला.

या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने उद्या मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवला आहे. यावेळी कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींवर हल्ला झाला त्याचा फक्त निषेध करायला नको. मराठी बांधवांवर, कार्यकर्त्यांवर हल्ले होतात. दडपशाही होत असते. आपण फक्त निषेधाचे खलिते पाठवतो.’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काल अजित पवारांनी निषेध केला तेवढ्याने चालणार नाही. दोन मंत्र्यांनी बेळगावला जाऊन समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच कालच्या घटनेला बेळगावची मराठी जनता जबाबदार आहे. महापालिका निवडणुकीत एकजूट दाखवली नाही. भाजपला विजयी केलं. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं बळ वाढलं. त्यातून हल्ले वाढले. हा मराठी माणसाला धडा आहे. एकजूट नसेल तर काय होतं हे कालच्या हल्ल्यातून दिसलं. याबाबत महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे, असंही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

कर्नाटक विधानसभेचे बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते.

पोलिसांकडूनही तसा दबाव आणला जात होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशावेळी अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली.

हे देखील पहा