त्यांना २२ काय ४० पैकी ४२ जागा मिळू दे…, राऊतांच्या फडणवीसांना चिमटा

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी अनेक नेते गोव्यात निवडणूकीच्या प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा गोव्यात पार पडली. तर देवेंद्र फडणवीस हे देखील गोव्यात मागील काही दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील गोव्यात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या गोव्यात भाजपाला पुर्ण बहुमत प्राप्त होईल. या मुद्द्यावर संजय राऊत बोलताना म्हणाले, की जिंकू द्या ना त्यांना. ते त्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांना बोलू द्या. नेत्यांना अशा पद्धतीचे बोलणे आवश्यक आहे. आम्ही देखील बोलतो. आम्ही बोलतो की ११ पैकी अकरा जागा जिंकू. आप, कॉंग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षाला वाटतंय आम्हाला पुर्ण बहुमत मिळेल.

काल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आत्मविश्वास वाढला आहे, या फडणवीसांच्या वक्तव्यांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगाल मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या होत्या. केरळ राज्यात देखील झाल्या होत्या. तसेच पंजाब राज्यात देखील होत आहेत. पंतप्रधान येतात तेव्हा मोठा महोल असतो. देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून लोक येतात,त्यांना ऐकतात. पंतप्रधान काही तरी आपल्याला देतील या अपेक्षांनी लोक त्याठिकाणी जातात. साधा मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेला तरी लोकांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोलताहेत ते बरोबर बोलत आहेत. त्यांना २२ काय ४० पैकी ४२ जागा मिळू दे. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी येत्या १४ फेब्रुवारीला मतदान होत आहे. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप सत्ता राखण्यासाठी यावेळी मोठी मेहनत घेत आहे. तसेच इतर राजकीय पक्षांचे प्रमुख नेते देखील प्रचारसभा घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील राजकीय वातावरण देखील तापलेलं दिसून येत आहे. त्यामुळे गोव्यात कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.