कर्नाटक हिजाब वाद : मुस्कानच्या हिजाब घालण्याच्या भूमिकेचे RSS कडून समर्थन

अयोध्या : कर्नाटकातून सुरू झालेल्या हिजाबच्या वादावर देशभरात आंदोलने करण्यात येत आहेत. हिजाबच्या वादावर देशातील राजकीय वातावरण देखील चागलंच तापलेलं दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुस्लिम शाखेने कर्नाटकातील विद्यार्थिनी मुस्कान खानला पाठिंबा दर्शविला आहे. हिजाब किंवा बुरखा हा देखील भारतीय संस्कृतीचा एक भाग असल्याचे संघाच्या शाखेने म्हटलं आहे.

RSS मुस्लिम राष्ट्रीय मंचने मुस्कानच्या हिजाब घालण्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच मुस्कानच्या भोवती घोषणा देणाऱ्या तरूणांचा निषेध व्यक्त केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रांत संचालक अनिल सिंह म्हणाले की, ती आमच्या समाजाची मुलगी आणि बहीण आहे. त्यांच्या संकटाच्या वेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

मुस्लिम राष्ट्रीय मंचने यासंदर्भात एक निवेदन दिले आहेत त्या निवेदनात असं म्हटलं आहे की, हिंदू संस्कृती महिलांचा आदर करण्यास शिकवते. तसेच ज्यांनी ‘जय श्री राम’चा नारा दिला. त्या मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत चुकीचे होते. मुलींना हिजाब घालण्याचे घटनात्मक स्वातंत्र्य आहे. जर त्यांनी शाळेत संस्थेतील कॅम्पस ड्रेस कोडचे उल्लंघन केले असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार संस्थेला आहे.

अनिल सिंह पुढे म्हणाले की, हिजाब किंवा बुरखा हा देखील भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे आणि हिंदू महिला त्यांच्या आवडीनुसार बुरखा घालतात. आमचे सरसंघचालक म्हणाले आहेत, मुस्लिम आमचे बांधव आहेत आणि दोन्ही समाजाचा डीएनए एकच आहे. मी हिंदू समाजातील सदस्यांना आवाहन करतो की त्यांनी मुस्लिमांना आपले बांधव म्हणून स्वीकारावे.