आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते, अस्वलाचा व्हिडीओ शेअर करत बंडखोरांवर संजय राऊत यांची टीका 

मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्या गटाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत.

शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याबद्दलची प्रतिमा चांगली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे मुख्य शिवसेनेत असलेल्या आमदार-खासदार आणि नेत्यांमध्ये बंडखोरांविरोधात रोष आहे.

दरम्यान, एवढं सगळं होऊन देखील संजय राऊत यांचा दांडपट्टा सुरूच असल्याचे चित्र आहे. आज संजय राऊत यांनी एक ट्विट करत बंडखोरांना सणसणीत टोला लगावला आहे.  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अस्वल दिसून येत आहे. हा अस्वल आरशासमोर येताच तो आरशात पाहून गोंधळून जातो. त्यानंतर आरशाच्या मागे-पुढे होऊन पाहू लागतो. आरशात पाहून तो इतका गोंधळून जातो की नेमकं काय सुरू आहे हे त्याला कळतंच नाही. हा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जेव्हा स्वत:ला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते’. संजय राऊतांनी हे ट्विट करत बंडखोरांवर निशाणा साधला आहे.