…म्हणून भावना गवळींऐवजी राजन विचारेंना प्रतोद केलं; संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या लोकसभेतील प्रमुख व्हीप भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरी लक्षात घेता शिवसेनेने भाजपसोबतचे अनेक दशके जुने संबंध पूर्ववत करावेत, अशी सूचना गवळी यांनी केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भावना गवळी (Bhavana Gawali) यांना लोकसभेच्या मुख्य व्हीप पदावरून हटवून त्यांच्या जागी राजन विचारे (Rajan Vichare) यांना ही जबाबदारी दिली.

यासंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.ते म्हणाले, व्हीप बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद पदाचं महत्त्व फार असतं. पुढच्या अडीच वर्षात अनेक निर्णय होतील. कामाला गती मिळायला हवी. भावना गवळी उत्तम काम करत होत्या. पण त्यांच्या काही कायदेशीर लढायांमुळे त्यांना दिल्लीत संसदेत उपस्थित राहाता येत नाही असं अनेकदा दिसलं.

अशा वेळी तिथे संसदेत मुख्य प्रतोद म्हणून व्यक्ती उपस्थित राहाणं आवश्यक असतं. काही आदेश काढायचे असतात, काही व्हीप काढायचे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.