आजपासून संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात; 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. त्यांच्या ईडी (ED) कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज तरी संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे.

राऊतांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं आहे. पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 31 जुलैंच्या मध्यरात्री अटक झाली. त्यानंतर गेले 8 दिवस ईडीच्या कोठडीत त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावले त्यांचीही चौकशी करण्यात आली.