‘मातोश्री’च्या वाटेला जाऊ नका नाहीतर 20 फुट खाली गाडले जाल’

नागपूर : राणा दाम्पत्य (Navneet Rana and ravi rana) विरुद्ध शिवसेना (shivsena) यांच्यात दिवसभर राडा पाहायला मिळाला. या संपूर्ण वादावरुन राजकारण ढवळून निघालं. दरम्यान, आज खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याला थेट अतिशय गंभीर इशारा दिलाय.

शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा करु नका, ‘मातोश्री’च्या वाटेला जाऊ नका नाहीतर 20 फुट खाली गाडले जाल असा अतिशय गंभीर इशारा संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. राणा दाम्पत्याने मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात शिखंडीच्या आड राहून शिवसेनेवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या मागे असलेल्यांना गाढल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. नव्याने महाभारत घडवण्याची ताकत ही शिवसेनेची आहे.जे पळून गेलेले आहेत, त्यांचे बहाणे काही असो, जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागले तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात.

दरम्यान, यानंतर खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत (sanjay Raut) यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच अज्ञात अशा 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी अॅम्ब्युलन्स आणली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.