हायकोर्टात पोहोचलेल्या एसडीएम ज्योती मौर्य यांची काय मागणी आहे? पतीने केलाय फसवणुकीचा आरोप

SDM Jyoti Maurya Case: एसडीएम ज्योती मौर्य यांनी बुधवारी (१६ ऑगस्ट) दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली. मीडियातील आपल्याविरोधातील सर्व साहित्य काढून टाकण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. याशिवाय ज्योती मौर्य यांनी प्रसारमाध्यमांना भविष्यातही परवानगीशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये, अशी सूचना देण्याची मागणी केली.

जूनमध्ये ज्योती मौर्य यांचे पती आलोक मौर्य मीडियाशी बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये आपल्या पत्नीवर फसवणुकीचा आरोप करत असून आमचे दोघांचे २०१० मध्ये लग्न झाल्याचे सांगत आहे. कोचिंगला जाऊन तिची स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणून मी कर्ज घेतले आणि माझ्या पत्नीला शिकवले, पण तिने माझी फसवणूक केली.

पीसीएस अधिकारी झाल्यानंतर ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. आलोकने ज्योती मौर्यवर होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, ज्योती मौर्य यांनी पती आलोक कुमार मौर्य आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात धुमनगंज पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

आलोक मौर्य आणि ज्योती मौर्य यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता. नंतर 2015 मध्ये, ज्योती मौर्य यांची यूपीपीएससीमध्ये एसडीएम पदासाठी निवड झाली. त्यांनी एसडीएम पदावर 16 वा क्रमांक मिळवला होता. दुसरीकडे, पती आलोक मौर्य प्रतापगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहेत.