शरद पवारांनी सर्व राजकारण अजित पवारांच्या हाती सोपवून निवृत्त व्हायला पाहिजे – निखील वागळे

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत जातील अशा चर्चा सुरू आहेत. तसेच अजित पवारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Ajit Pawar Meets Amit Shah) यांची भेट घेतल्याचेही म्हटले जात आहे. याबद्दल ‘मुंबई तक’वर एक चर्चा सत्र आयोजण्यात आले होते. या चर्चा सत्रात जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) सहभागी झाले होते. यावेळी निखील वागळेंनी राष्ट्रवादीतील अस्वस्थता आणि अजित पवार काय करु शकतात याबद्दल आपली भूमिका मांडली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना एक सल्लाही दिला.

अजित पवारांबद्दल बोलताना पत्रकार निखील वागळे स्पष्टच म्हणाले की, “राष्ट्रवादीतील २/३ तृतीयांश आमदार अजित पवारांसोबत जातील. जे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसाठी केले आहे, तेच गेली कित्येक वर्षे अजित पवार राष्ट्रवादीसाठी करत आहेत.”

“अजित पवार हे तोंडाने फाटके आहेत. जे सत्य आहे, तेच ते बोलतात. ते त्यांच्याच मनाचे ऐकतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावानुसार ते नक्कीच राष्ट्रवादीला दणका देतील. पण शरद पवार हळूहळू निष्प्रभ होत जातील. ते एक सांस्कृतिक नेते म्हणून राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचे योगदान मोठे आहे. परंतु मला असं वाटतं की, जर अजित पवार राष्ट्रवादीबरोबर राहिले तर शरद पवारांनी सर्व राजकारण अजित पवारांच्या हाती सोपवले पाहिजे. शरद पवारांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे आणि उरलेलं आयुष्य मजेने जगलं पाहिजे. कारण एरवी अजित पवार तर त्यांना ऐकणारे नाहीत,” असे मत निखील वागळेंनी मांडले आहे.