शादी मुबारक..! शाहिद आफ्रिदीची लेक अंशासोबत शाहीनने केला निकाह, फोटो तुफान व्हायरल

कराची- क्रिकेटविश्वात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल लग्नबंधनात अडकला. त्याच्यापाठोपाठ गोलंदाज अक्षर पटेलही बोहल्यावर चढला. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनेही (Shaheen Afridi) निकाह केला आहे. शुक्रवारी, दि. ३ फेब्रुवारीला शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीसोबत शाहीनने निकाल केला आहे. त्यांच्या निकाहला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह (Babar Azam) इतर खेळाडू उपस्थित होते.

आफ्रिदीच्या मुलीसोबत (Shahid Afridi Daughter) शाहीनचा विवाह २०२० मध्येच निश्चित झाला होता. अखेर काल सर्व इस्लामिक विधींसह त्यांचा निकाह (Shaheen Afridi Wedding) पूर्ण झाला. शाहीनच्या लग्नाचे सर्व विधी कराचीत पार पडले. येथेच वधू-वरांनी निकाह वाचला आणि संपूर्ण विवाह सोहळा या शहरात झाला. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि माजी कर्णधार सरफराज अहमद यांच्यासह सर्व खेळाडूंनी शाहीनच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. शाहीनचा निकाह करतानाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

शाहीनने त्याच्या अचूक लेंथ आणि वेगाच्या जोरावर पाकिस्तान संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तानकडून २५ कसोटी सामने खेळताना ९९ विकेट्स घेतल्या आहेत. तर ३२ वनडे सामन्यात ६२ विकेट्स आणि ४७ टी२० सामन्यात ५८ विकेट्सची त्याच्या नावावर नोंद आहे. तो आगामी वनडे विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तान संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.