शेन वॉर्नने पाकिस्तानच्या माजी कर्णधारावर दीड कोटींची लाच दिल्याचा केला आरोप

सिडनी –  ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकवर मोठा आरोप केला आहे. शेन वॉर्नच्या म्हणण्यानुसार, सलीम मलिकने त्याला सामना हरण्यासाठी दीड कोटींची लाच देऊ केली होती.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खराब कामगिरी केल्याबद्दल सलीम मलिकने सुमारे दीड कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचे शेन वॉर्नने म्हटले आहे. हे प्रकरण 1994 मध्ये कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याशी संबंधित असून चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.त्याच्या आगामी ‘शेन’ या माहितीपटात वॉर्नने सलीम मलिकवर मोठा आरोप केला आहे.

शेन वॉर्न म्हणाला, आम्ही पाकिस्तानचा पराभव करू, याची आम्हाला पूर्ण खात्री होती. मी दरवाजा ठोठावला तेव्हा सलीम मलिक यांनी दरवाजा उघडला. मी बसलो तेव्हा तो म्हणाला की ऑस्ट्रेलिया चांगला सामना खेळत आहे, म्हणून मी उत्तरात म्हणालो की हो, माझ्या मते उद्याचा सामना आपण जिंकला पाहिजे. यानंतर तो म्हणाला की आम्ही हा सामना गमावू शकत नाही. जेव्हा आपण पाकिस्तानमध्ये सामना गमावतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहीत आहे. आमची घरे जाळली जातील, कुटुंबाची घरे जाळली जातील.त्यानंतर शेन वॉर्नने सांगितले की, सलीम मलिकने त्याला आणि त्याचा सहकारी टिम मे यांना लाखो डॉलर्सची लाच देऊ केली.

या सर्व प्रकारामुळे शेन वॉर्नला त्यानंतर काय बोलावे तेच कळेना. दरम्यान, पुढे या सामन्यात शेन वॉर्नला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले पण पाकिस्तानने हा सामना एका विकेटने जिंकला.