आज पाया पडणारे, उद्या पाय खेचणार असतील तर… दैनिक ‘सामना’तून राष्ट्रवादीच्या नेत्यांची धुलाई 

Mumbai – ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Sharad Pawar Announced Retirement) देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. यानंतर आता राष्ट्रवादीत राजीमान्यांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आमदार अनिल पाटील हे राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिलेले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीतील सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे आणि पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही.असं या अग्रलेखात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे आणि राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला.असा दावा या अग्रलेखात करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत आणि त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्या जास्त विलाप केला.असं देखील या अग्रलेखात म्हटले आहे.

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ आणि हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी . शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील.असं देखील या अग्रलेखात म्हटले आहे.