Ambedkar-Pawar Meeting : प्रकाश आंबेडकरांसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? शरद पवार म्हणाले…

Mumbai- नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईत भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अलीकडेच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. या युतीनंतर वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनेल का असा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता या भेटीवर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आंबेडकरांशी आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेगळ्या असतील, तर सहकार्य करता येईल का? याबाबत चर्चा केली आहे. आंबेडकर त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडं पाठवणार आहे. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल. यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

२०२४ च्या निवडणुक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार का? वंचित आघाडीही बरोबर असेल का? असा प्रश्न शरद पवार विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं, “वंचित आघाडीबरोबर आमची चर्चा झाली नाही. वंचितशी आमची चर्चा कर्नाटकातील मर्यादित जागेशिवाय दुसरी कोणतीही झाली नाही. सध्यातरी महाविकास असून, एकत्र लढण्याची इच्छा आहे. इच्छा नेहमीच पुरेसी नसते. जागांचं वाटप अजून ठरलंच नाही.”