पुरंदरेंवरील टीकेचं दु:ख नाही तर अभिमान वाटतो, शरद पवारांचं प्रत्युत्तर

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)   यांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी पवारांना लक्ष्य केले होते. यावर बोलताना पवार म्हणाले, आता त्यांनी काल सांगितलं की, पुरंदरेंबाबत मी बोललो.. हो बोललोच मी.. मी काही रोखून ठेवत नाही. पण पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी जिजामातेनं शिवछत्रपतींचं व्यक्तीमत्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी योगदान दिलं अशा प्रकारचं विधान केलं होतं. त्याला माझा सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे राजमाता जिजामाता यांनी कष्टानं उभं केलं.

त्यामुळे शिवाजी महाराज या पदापर्यंत पोहचायला कोणाचं योगदान असेल तर ते राजमातेचं योगदान होतं. बाबासाहेबांनी त्याबाबतीत एक भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तो योग्य नव्हता. हे माझं मत तेव्हा होतं आणि आजही आहे. त्यासाठी मी निश्चितपणाने त्यावर टीका केली.दुसरा गंभीर प्रकार हा होता की, जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छपणे लिहलं होतं की, ही माहिती मी पुरंदरेंकडून घेतली. त्यामुळे एक गलिच्छ अशा प्रकारचं लिखाण एखाद्या लेखकाने केलं आणि त्याला माहिती पुरवायचं काम कोणी केलं हे उघड होत असेल आणि त्याचा खुलासा कधी पुरंदरेंनी केला नाही म्हणून तर त्याच्यावर टीका-टिप्पणी केली असेल तर मला त्यात दु:ख वाटत नाही. याउलट मला त्याचा अभिमान वाटतो. असं म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.