महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी  शरद पवारांची धडपड सुरुच 

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर बनले आहे. आता सरकार वाचावण्यासाठी शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. या नेत्यांमध्ये अनिल देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.