बंडखोरांवर कडाडून टीका करणाऱ्या शीतल म्हात्रे शिंदे गटात होणार सामील; शिवसेनेला मोठा धक्का

मुंबई : राज्यातील राजकीय नाट्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिंदे गटातील आमदार आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक चकमक दिवसेंदिवस वाढत आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता शिवसेनेला मोठा धक्का मुंबईत बसला आहे. मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शीतल म्हात्रे या दहीसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका आहेत. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. मुंबईतील आमदारांपाठोपाठ आता नगरसेवक ही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शीतल म्हात्रे यांचा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग झाल्याचं सांगितलं जात आहे.