आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून हिंदुत्व पुसण्याचं काम केलं; शिंदे गटातून जहरी टीका

हिंगोली| काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज ६५ वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांपासून भारत जोडो यात्रा सुरू आहे. आज दुपारी ही यात्रा नांदेडचा शेजारी जिल्हा हिंगोलीत (Hingoli) प्रवेश करेल. हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सहभागी होणार असून तेदेखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची साथ देतील.

मात्र आदित्य ठाकरे यांच्या काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या निर्णयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे (Rahul Londhe) यांनी जहरी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पायदळी तुडवून आज आदित्य ठाकरे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. आदित्य ठाकरे यांना आपल्याच आजोबांच्या विचारांचा विसर पडला का?, असा सवालही राहुल लोंढे यांनी यादरम्यान उपस्थित केला आहे.

माध्यमांशी बोलताना राहुल लोंढे म्हणाले की, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेसने देश तोडण्याचे काम केले. बाळासाहेबांनी कधीही हिंदुविरोधी वागणाऱ्या काँग्रेसला जवळ केले नाही. हिंदुत्वाची ऍलर्जी असलेल्या काँग्रेसला कधीही स्वत:च्या बाजूला बसवले नाही. परंतु आज त्याच बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत.”

“मला वाटते की, या पावलासह आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचं पूर्ण हिंदुत्त्व पुसण्याच काम केलं आहे. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून आदित्य ठाकरे आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यांच्या यात्रेत सहभागी होत आहेत. आदित्य ठाकरे यांना आपल्याच आजोबांच्या विचारांचा विसर पडला का?,” असा प्रश्नही राहुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

‘आझाद मराठी’चा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा