कॅप्टन्सीसह फलंदाजीतही रोहित सपशेल फेल, भविष्यात ‘हा’ क्रिकेटर बनू शकतो टी२०चा कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाला (Team India) पुन्हा एकदा आयसीसीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेतून (T20 World Cup 2022) रिकामे हात माघारी परतावे लागले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघात गुरुवारी (१० नोव्हेंबर) ऍडलेड येथे टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना झाला. या अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाला १० विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह भारतीय संघाची १५ वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रॉफीची प्रतिक्षा आणखी लांबली.

उपांत्य सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवानंतर खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. टी२० विश्वचषकातील सर्व खेळाडूंचे प्रदर्शन पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने कठोर निर्णय घेऊ शकते. यामध्ये सर्वप्रथम बीसीसीआय कर्णधारपदाबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माची होणार हाकालपट्टी?
भारताच्या टी२० संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा फॉर्म टी२० विश्वचषकात पुरता गंडलेला दिसला. रोहितच्या कर्णधार म्हणून देहबोलीतूनही अनेक गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. उपांत्य फेरी सामन्यात रोहितने ज्या प्रकारे गोलंदाज रोटेट केले ते समजण्यापलीकडे होते. उपांत्यफेरीच्या या सामन्यात क्षेत्ररक्षणाच्यावेळी पॉवरप्लेमध्ये स्लीपमध्ये केवळ एकच खेळाडू ठेवला, यावरून समजते भारतीय संघ बचावात्मक पवित्रेत खेळत आहे.

नेतृत्त्वाबरोबरच वैयक्तिक कामगिरीतही रोहित पूर्णपणे फेल ठरला. त्याने संपूर्ण विश्वचषकात ६ सामन्यांमध्ये अतिशय निराशाजनक १९.३३ च्या सरासरीने फलंदाजी केली. तो फक्त ११६ धावा करण्यात यशस्वी राहिला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले. दुसरीकडे अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने प्रभावी खेळ दाखवला. त्याने संघासाठी फिनिशरची भूमिका निभावताना आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिले. उपांत्य सामन्यातही त्याने ६३ धावांची तुफानी खेळी केली होती.

हार्दिक बनू शकतो भावी कर्णधार
हार्दिकचा गेल्या काही महिन्यांतील खेळ पाहता भविष्यात तो भारताच्या टी२० संघाची कमान सांभाळताना दिसू शकतो. इनसाइड स्पोर्ट या वेबसाइटने बीसीसीआयच्या अधिकृत अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘अर्थात भविष्यात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आम्ही टी२० विश्वचषकाची तयारी केली होती. संघ तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आला होता. काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे आमच्या योजनांवर नक्कीच परिणाम झाला, पण खेळात आम्हाला अशा समस्यांना सामोरे जावे लागते.’

अशात आता भारताच्या आगामी टी२० मालिकांमध्ये संघाची धुरा कोणाच्या हाती असेल, हे पाहाणे औत्सुक्याचे असेल.

‘आझाद मराठी’चा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा