‘नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवला तर सेना-भाजप एकत्र येतील’

नवी दिल्ली : जुने मित्र असलेले भाजप शिवसेना वेगळे झाले अन् राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली आणि सत्तेची खुर्ची काबीज केली. भाजप-सेनेची फारकत झाली असली तरी या युतीची चर्चा वारंवार होतच असते. महिना दोन महिन्यातून राजकीय वर्तृकात या चर्चांना पेव फुटतच असतो. याचं कारणही याच दोन्ही पक्षांतील नेत्यांचे वक्तव्यच असतात. आज पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अशाच एका विधानाने युतीची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारणही तसेच आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांनी भाजप-सेने युतीबाबत भाष्य केले आहे. गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवल्यास सेना आणि भाजप एकत्र येतील, असा दावा केलाय.

नितीन गडकरी यांनी राज्यात लक्ष घातले तर शिवसेना भाजप एकत्र येईल. शिवसेना-भाजप यांना एकत्र आणण्याची चावी गडकरी यांच्याकडे आहे, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. सत्तार यांनी आज मराठवाड्यातल्या कामांसंदर्भात दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली. त्याचबरोबर पक्षाचे नेतृत्व रश्मी ठाकरे यांच्याकडे दिले तरी कोणाची हरकत नसेल, असेही सत्तार म्हणालेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला तर सेना भाजप एकत्र येईल. गडकरी राज्यात आले तर सेना भाजपची मने जुळतील, असे वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.