मंत्री छगन भुजबळांनी बॅटिंग करत लुटला क्रिकेटचा मनमुराद आनंद

येवला :- येवला क्रीडा संकुलाच्या नूतनिकरणास तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून लवकरच या संकुलाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. येवल्यातील क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळ पुन्हा सुरू होऊन खेळाडू घडले पाहिजे तसेच सर्वच क्षेत्रात येवला पुढे असलं पाहिजे असा आपला नेहमीच प्रयत्न असतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

स्वामी मुक्तानंद विद्यालय पटांगण, येवला येथे शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेस मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, गणेश शिंदे, प्रवीण बनकर, राजेश भांडगे,दिपक लोणारी, सचिन कळमकर,क्रीडा स्पर्धेचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सचिव सुनील शिंदे, सदस्य राजेंद्र बाकळे, प्रशांत शिनकर, सुशांत हजारे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी यांच्यासह सुनील पैठणकर, सुभाष गांगुर्डे,भाऊसाहेब धनवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे विविध उपक्रम साजरे झाले नाही. आता निर्बंध उठविण्यात आल्याने सर्व उपक्रम सण उत्सव पुन्हा उत्साहात साजरे होत आहे याचा आनंद आहे. यापुढील काळात पुन्हा अशी वेळ येणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. टीम वर्कच्या माध्यमातून नेहमीच चांगलं काम होत असते. येवल्यातही आपले टीमवर्क असल्याने येवल्याचा विकास होत असून यापुढील काळातही विकासाची कामे होतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, खेळाला वयाचे बंधन नाही. आपल्या या स्पर्धेत विविध क्षेत्रातील काम करणारे लोक सहभागी झालेले आहेत. खेळाडूंना यातून व्यासपीठ मिळणार आहे.
आज ग्रामीण भागातील खेळाडूंना आयपीएल सारख्या स्पर्धांमधून संधी मिळाली असुन अनेक खेळाडू नावारूपाला येत असल्याचे त्यांनी सांगत. विविध प्रकारच्या स्पर्धा नेहमीच भरविल्या जाव्यात असे आवाहन त्यांनी केले.