शिवसेनेच्या तोंडाला सुटले पाणी; आता थेट भाजपच्या बालेकिल्ल्यावरच दावा ठोकला

भंडारा : भाजपने पालघर, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा सांगून शिवसेनेला डिवचले असतानाच आता शिवसेनेने देखील भाजपच्या बालेकिल्ल्यावरच दावा सांगितला आहे. एवढेच नव्हे तर हा मतदारसंघ लढण्याचा ठरावही शिवसेनेने केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची काल बैठक झाली. या बैठकीत भंडारा-गोंदियातून निवडणूक लढण्याचा ठराव करण्यात आला. विशेष म्हणजे सध्या या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे (Sunil Mendhe)हे खासदार आहेत. विद्यमान खासदार असतानाही शिवसेनेकडून अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

भंडरा आणि गोंदियातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकत आहे. इतकेच नाही तर गोंदिया जिल्ह्यातही शिवसेनेची संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थाने शिवसेनेचा आहे. त्यामुळे या मतदारसंघात आपलाच उमेदवार राहिला पाहिजे, असा ठराव या कार्यकारिणीत करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.Tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.