काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय माहित नाही – संजय राऊत

पणजी : पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीत भाजप, काँगेससह देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेने गोव्यात देखील निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गोव्यातील चकरा देखील वाढल्या असून शिवसेने निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली असून त्यांनी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा प्रस्तव ठेवला होता. मात्र, स्थानिक काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या प्रस्तवाला केराची टोपली दाखवली असल्याची माहिती आहे.

यावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही काही झोळी घेऊन उभे नाहीत त्यांच्यापुढे. आम्ही फक्त राहुल गांधींसमोर प्रपोझल ठेवलं. महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत, गोव्यातही एकत्र लढू. राहुल गांधींशी चर्चा झाली तेव्हा ते याबाबत सकारात्मक आहेत. पण स्थानिक काँग्रेस नेतृत्वाच्या डोक्यात काय वळवळतंय, माहिती नाही’, असे संजय राऊत म्हणाले.