शौरेन सोमण व नैशा रेवासकर यांना मिश्र दुहेरीचे विजेतेपद

पुणे- शौरेन सोमण व नैशा रेवासकर या बिगर मानांकित जोडीने आश्चर्यजनक विजयाची मालिका ठेवीत शारदा स्पोर्ट्स सेंटर आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

शारदा स्पोर्ट्स सेंटर (Sarada Sports Centre)  येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सोमण व रेवासकर यांनी तृतीय मानांकित जान्हवी फणसे व दीपेश अभ्यंकर यांच्यावर मात केली. चुरशीच्या सामन्यात त्यांनी ११-८,१४-१२,११-६ असा विजय मिळवताना परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. त्याआधी उपांत्य फेरीत त्यांनी अग्रमानांकित वैभव दहिभाते व प्राजक्ता मोरे यांच्यावर सनसनाटी मात केली होती. ही लढत त्यांनी १३-११,११-६,११-७ अशी जिंकली. उपांत्य फेरीतील फणसे व अभ्यंकर यांनी प्रणव खेडकर व तितिक्षा पवार यांचे आव्हान ९-११,११-६, ११-८,११-५ असे संपुष्टात आणले होते.

मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात मोहील ठाकूर व टॉम एल्वीस यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत अग्रमानांकित खेळाडू ठाकूर याने धैर्य शहा या चौथ्या मानांकित खेळाडूला १३-११,११-२,११-९ असे पराभूत केले. त्याने काउंटर ॲटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला या लढतीच्या तुलनेत एल्वीस याला मात्र द्वितीय मानांकित खेळाडू नीरव मुळ्ये याच्याविरुद्ध विजयश्री मिळवताना संघर्ष करावा लागला. शेवटपर्यंत उत्कंठा पूर्ण झालेला हा सामना त्याने ९-११, ११-९, ७-११,११-९,११-८ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला शेवटच्या गेम मध्ये मात्र चांगले नियंत्रण ठेवले आणि सनसनाटी विजय नोंदविला.