४० कोटींची कुठली तरी फाईल …; मनिषा कायंदेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – एक वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत. विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे (Manisha Kayande )यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मनिषा कायंदे यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, संजय राऊतांनी त्यावर बोलणं सुरुवातीला टाळलं. नंतर ते म्हणाले, ४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून बाई (मनिषा कायंदे) गेल्या असं मी काल व्यासपीठावर ऐकलं. मला त्याबद्दल काही माहिती नाही, मी यावर फार बोलणार नाही.

खासदार संजय राऊत म्हणाले, हे लोक येतात कुठून, जातात कसे, हा संशोधनाचा विषय आहे. भविष्यात आम्हाला यावर विचार करावा लागेल. मुळात हे लोक कुठून येतात, कुठे जातात याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांना पक्षात कोणी आणलं आणि कोणी विधान परिषदेवर पाठवलं यातलं काहीच माहिती नाही. असे लोक येतात आणि जातात. मी त्यांना कचरा म्हणतो. हवा आली की हा कचरा उडून जातो. आम्ही अशा लोकांना मानत नाही. मी अशा लोकांशी ओळख ठेवत नाही.