हैदराबादमध्ये ‘शुबमन’ नावाचे वादळ! गिलने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले पहिलेवहिले वनडे द्विशतक

हैदराबाद- भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात धुव्वादार फटकेबाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढत वनडेतील तिसरे शतक झळकावले. पुढे शतकी खेळीला त्याने द्विशतकात रुपांतरित केले. ४९व्या षटकात सलग ३ षटकार मारत शानदार स्टाईलमध्ये त्याने द्विशतकाला गवसणी घातली. तो वनडेत द्विशतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज आहे.

गिल १४९ चेंडूंचा सामना करताना ९ षटकार आणि १९ चौकारांसह २०८ धावांवर बाद झाला. यासह शुबमन वनडेत द्विशतक ठोकणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज बनला आहे. २३ वर्षे आणि १३२ दिवसांचे वय असताना शुबमनने द्विशतक झळकावले आहे. या विक्रमात त्याने इशान किशन आणि रोहित शर्मा यांना मागे सोडले आहे. तसेच तो न्यूझीलंडविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाराही पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने सचिन तेंडूलकरला मागे सोडले आहे.