पाकडे काय बरोबरी करणार? स्म्रीतीला WPL मध्ये मिळालेल्या किमतीच्या आसपासही नाही बाबर आझम

Mumbai: नुकताच मुंबईत महिला आयपीएल २०२३चा लिलाव पार पडला. या लिलावात ५ फ्रँचायझींनी मिळून महिला क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पाडला. या लिलावातील विशेष आकर्षण ठरली भारताची धाकड सलामीवीर स्म्रीती मंधाना. स्म्रीती लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिने आयपीएलच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. लिलावात फ्रँचायझींनी महिला खेळाडूंवर बक्कळ पैसा खर्च केल्यानंतर सोशल मीडियावर नव्या चर्चा रंगल्या आहेत. लोकांनी महिला आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) ची तुलना करत बाबर आझम याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

भारतीय संघाची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधाना ही ५० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरली होती. तिला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर ३ कोटी आणि ४० लाख रुपयांना बेंगलोरने स्म्रीतीला (Smriti Madhana) विकत घेतले. यासह स्म्रीती महिला आयपीएलच्या पहिल्यावहिल्या लिलावात सर्वात महागडी विकली जाणारी खेळाडू बनली (Most Expensive Player) आहे. 

यानंतर एका चाहत्याने ट्विट केले की, ‘स्म्रीती मंधानाचा महिला आयपीएलमधील पगार आता बाबर आझमच्या (Babar Azam) पीएसएल पगारापेक्षा जास्त आहे.’ आणखी एका ट्विटर युजरने लिहिले, ‘पीएसएलमध्ये बाबर आझमची किंमत- २.३० कोटी. स्म्रीती मंधाना – ३.४ कोटी. आणि ते पीएसएलची आयपीएलशी तुलना करतात.’

दरम्यान आरसीबीचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी संकेत दिले आहेत की, सलामीवीर स्म्रीती महिला आयपीएलच्या आगामी हंगामात बेंगलोर संघाचे नेतृत्व करू शकते. माईक हेसन म्हणाले की, “असे कौशल्य असलेले खेळाडू मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. मंधाना, एलिसा पेरी आणि सोफी डिव्हाईन यांचा संघात समावेश करणे आमच्यासाठी चांगले आहे. स्म्रीतीला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे आणि ती भारतीय परिस्थितींशी परिचित आहे त्यामुळे तिची कर्णधार होण्याची दाट शक्यता आहे.”