पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याची विरोधकांनी घेतली धास्ती? भाजपला मिळणार बुस्टर डोस  

Pune Bypoll Election : एकीकडे पुण्यातील कसबा (Pune ByPoll Election ) आणि चिंचवड पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा आहे आणि त्यातच या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांनादेखील उपस्थित राहणार आहेत.

भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा सध्याची पोटनिवडणूक, आगामी महापालिका निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका  डोळ्यासमोर ठेवून आखला आहे.या दौऱ्यात ते महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी करावी लागणाऱ्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत अशी चर्चा आहे. दरम्यान, या दौऱ्याची भाजप कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता लागली असताना विरोधकांनी मात्र या दौऱ्याची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे.

पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा पुणे दौरा हा गेमचेंजिंग ठरू शकतो. शाह हे आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी तसेच बेधडक वक्तव्य करण्यासाठी ओळखले जातात. या दौऱ्यामुळे काही प्रमाणात भाजपपासून दूर गेलेले मतदार पुन्हा भाजपकडे वळण्याची शक्यता आहे. हे विरोधकांच्या लक्षात आल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शाह यांच्या या दौऱ्यावर कठोर शब्दात टीका करत आहे अशी चर्चा आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून ते ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे नेते शाह यांच्या दौऱ्यावर टीका करत आहेत. यात कहर म्हणजे हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी तर मी निवडणुकीच्या मैदानात असल्यानेच अमित शाह यांना पुण्यात यावे लागले असा हास्यास्पद दावा केला आहे. खरतर भाजप हा पक्ष असा आहे की तो कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही यामुळे जर समजा या पोटनिवडणूकीसाठी जरी अमित शाह येणार असतील तरी विरोधकांच्या पोटात गोळा येण्याचे कारण काय हे जाणकार लोकांना ठावूक आहे. पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा हा दौरा भाजपसाठी बुस्टर डोस ठरणार असून या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास भाजपनेते व्यक्त करत आहेत. दरम्यान, शाह यांचा हा दौरा भाजपसाठी फायदेशीर ठरला की नाही हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.