देशमुख, मलिक यांच्यानंतर आता कुणाचा नंबर? ; सोमय्यांनी घेतलं आता ‘या’ मंत्र्याचे नाव 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.