येणाऱ्या काळात भाजप को करारा जवाब मिलेगा; अमोल मिटकरी यांचा इशारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आज ईडीच्या कार्यालयात कुठलीही नोटीस नसताना अनधिकृत त्यांना पाठवलं. पवार साहेबांनी काही मिनिटांपूर्वी स्टेटमेंट दिले की हे होणारच होतं. ज्या पद्धतीने भाजपचा बुरखा नवाब मलिक फाडणार होते. त्याच्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.

यांनी मराठा नेते संपवले , यांनी ओबीसी नेते संपवले आणि आता हे मुस्लिम नेत्यांना संपवायला लागले आहेत. त्यामुळे आता भाजप शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत आहे. भाजप वाले पळकुटे आहेत ते आता घाबरले आहेत..त्यामुळे येणाऱ्या काळात “भाजप को करारा जवाब मिलेगा” अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.