‘रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे’

मुंबई : काही दिवसात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप तीन दशकापासून ठाण मांडूण बसलेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेनेकडून आणि सरकारकडून रोज नव्या घोषणा करण्यात येत आहे. यावरून या अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडजंगी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत बोलताना रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोमणा मारला आहे.

मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार. यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे. पण आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं चुकीचं आहे.केवळ महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय. चांगली कामं विरोधकांना कधी दिसतच नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टीकेला भाजप कसं उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.