कुटुंबियांना का त्रास देताय? जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो – ठाकरे

 मुंबई :  केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक नेते, मंत्री गोत्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.  केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कुटुंबियांना त्रास देण्याचा अत्यंत नीच प्रकार सध्या घडतोय. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो असं आव्हान  उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.

ते म्हणाले की, आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास दिला जातोय. आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का? ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू आहे. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत असं विरोधक म्हणतायंत. पण ‘पहाटेचा प्रयोग’ यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते. मग ते भ्रष्टाचारी ठरले असते का. किंवा आम्ही जर तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना त्रास दिला असता का?

दरम्यान,  काही दिवसात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप तीन दशकापासून ठाण मांडूण बसलेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेनेकडून आणि सरकारकडून रोज नव्या घोषणा करण्यात येत आहे. यावरून या अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडजंगी सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत बोलताना  रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोमणा मारला आहे.

मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार. यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे. पण आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं चुकीचं आहे.केवळ महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय. चांगली कामं विरोधकांना कधी दिसतच नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टीकेला भाजप कसं उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.