‘पवार साहेब कंसाला जसा रात्रंदिवस कृष्ण दिसायचा तसे तुम्हाला देवेंद्र दिसतात’

Sharad Pawar : समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजीक काल रात्री झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर (Prime Minister Narendra Modi on Twitter) संदेशातून या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी रुग्णांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे.

दरम्यान, या अतिशय वेदनादायी मुद्द्याचे देखील राजकारण विरोधकांनी सुरु केले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांचा देखील या दुखद प्रसंगी संयम ढळल्याचे दिसून आले. समृद्धी महामार्गावरील अपघातावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की, आमच्या गावातील लोक सांगत होते, एखादा दुसऱ्या अपघातात व्यक्ती गेली. तर, लोक म्हणतात या अपघतात एक ‘देवेंद्रवासी’ झाला. रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण, आज झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दु:खद आहे.

दरम्यान, भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या मुद्द्यावरून पवारांवर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार तुम्हीच खरे ‘देवेंद्रवासी’. कारण ‘वासी’ म्हणजे वास्तव्य करणं. कंसाला जसा रात्रंदिवस कृष्ण दिसायचा तसे तुम्हाला देवेंद्र दिसतात. क्षणोक्षणी देवेंद्राचे चिंतन-मनन करत त्यांच्यातच राहणारे तुम्हीच खरे ‘देवेंद्रवासी’ असं म्हणत भोसले यांनी शरसंधान केले आहे.