धावत्या रेल्वेतून मुलगा पडला वैनगंगा नदीत, त्याला वाचवताना आईचाही रेल्वे खांबाला आदळून मृत्यू

भंडारा- धावत्या रेल्वे गाडीतून मुलगा पडल्याचे दिसताच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा तोल गेल्याने ती सुद्धा खाली पडली. या घटनेत मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर आईचा रेल्वे खांबाला आदळल्याने मृत्यू झाला.

ही दुर्देवी घटना भंडारा ते गोंदिया रेल्वेमार्गावरील माडगी येथील वैनगंगा नदीच्या रेल्वे पुलावर घडली. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. रविवारी रात्री नागपूरवरुन गोंदियाच्या दिशेने एक परिवार रेल्वेने जात होते. तुमसर रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढील प्रवासाला निघाल्यानंतर आई गाडीतील प्रसाधनगृहाकडे निघाली.

गाडी वैनगंगा नदीच्या पुलावर येताच तिचा दीड वर्षाचा मुलगा धावत पुढे गेला. त्याचवेळी तो वैनगंगा नदीत पडला. मुलाला वाचविण्यासाठी आईचाही तोल गेला आणि तीसुद्धा पुलावर कोसळली. या घटनेत मुलाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. तर आईचा रेल्वे खांबाला आदळल्याने मृत्यू झाला.