मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आता खाजगी बाऊन्सर ठेवावे; विश्वंभर चौधरी यांचा सल्ला 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या सिल्व्हर ओक  या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी गृह विभागावर टीका केली असून विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar chaudhari)  यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, हल्ला होणार हे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला कळलं नसेल तर अवघड आहे. हा intelligence failure चा मामला आहे. अशा गृहखात्यावर विसंबून राहू नये, यापुढे शेजारी राज्याच्या पोलीसांची मदत घ्यावी मविआ सरकारनं! केंद्रात आयबी (IB) आणि राज्यात सीआयडी (CID) यांना काही समजू शकलं नाही यावर कोणी विश्वास ठेवायचा? या यंत्रणांचं नेटवर्क एवढं मोठं आहे की अमक्यानं आज जेवणाच्या डब्यात कोणती भाजी नेली याचा शोधही ते काढू शकतात.

गृहखात्याची कामगिरी फक्त वाधवानला महाबळेश्वरला पोचवण्यापुरती आणि बदल्यांचे शंभर कोटी गोळा करण्याइतकी राहिली असेल तर आता या खात्यावर अवलंबून न राहता कर्नाटक किंवा बंगालच्या पोलिसांकडे आपल्या संरक्षणाचं काम outsource करावं, मविआ सरकारनं ताबडतोब टेंडर काढून वेगवेगळ्या राज्यांच्या पोलीसांकडून निविदा मागवाव्या. तेवढं तर या सरकारला चांगलंच अवगत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी खाजगी बाऊन्सर ठेवावे. असं त्यांनी म्हटले आहे.