लालमहल येथे चित्रित केलेले लावणी नृत्य समाजमाध्यमात व्हायरल करुन भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाई करा – भाजप

पुणे – हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज (Chhatrapati Shri Shivaji Maharaj) यांच्या वास्तव्याने आणि पराक्रमाने पावन झालेला लालमहल समस्त हिंदुंसाठी एक पवित्र स्थान आहे. ही केवळ एक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याचा इतिहासाचे सोनेरी पर्व यात दडलेले आहे. त्यामुळे या वास्तुची गरिमा, पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यकच आहे. समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सदर व्हिडिओ हा लालमहलमध्ये (Lal Mahal) चित्रित केला गेला असून यात लावणीवर नृत्य (Lavani Dance) केल्याचा प्रकार आहे. लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असली, तरी त्याचे सादरणीकरण करण्यासाठी वेगळी व्यासपीठे उपलब्ध आहेत. मात्र तरीही लालमहलमध्ये हा प्रकार घडला. हे जितके धक्कादायक आहे, तितकेच चीड आणणारेही. सदर प्रकारामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून आपण स्वतः या प्रकरणी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची भेट घेऊन केली. आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) सोबत होत्या.

मुळीक पुढे म्हणाले, नृत्य सादर केल्याप्रकरणी नृत्यांगनेवर कारवाई तर करावीच, शिवाय तीला आतमध्ये जाण्यास कोणी मदत केली? सुरक्षारक्षक काय करत होते? जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका काय? याचीही उत्तरे मिळवून योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे.

राष्ट्रवादीचे आंदोलन ही नौटंकी

या विषयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आंदोलन ही नौटंकी आहे. लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या पालिकेत प्रशासक आहे. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. म्हणजे हे आंदोलन राज्य सरकार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात करत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी ते आंदोलन करीत आहेत.