पुण्यातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रासाठी असे होते वर्ष २०२३, २०१९च्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहारात तब्बल ९०% इतकी वाढ

Real Estate : सर्वत्र नव्या वर्षाची चाहूल लागली आहे, आपण सर्वच जण नव्या उमेदीने या वर्षाच्या स्वागतासाठी आतुर आहोत. हे होत असताना पुणे विभागातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रासाठी देखील २०२३ हे वर्ष फलदायी ठरले आहे. या वर्षात भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील रिअल इस्टेट बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी बाजारपेठ म्हणून नावारूपास आली आहेच शिवाय कोविडनंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्र पूर्वपदावर येऊन नजीकच्या भविष्यासाठी देखील सज्ज झाले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, “मागील वर्षभरात पुणे शहराची रिअल इस्टेट बाजारपेठ ही भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढणारी आणि परवडणारी बाजारपेठ ठरली आहे. पुनर्विक्री वगळून पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये तब्बल ९० हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. २०१९ च्या तुलनेत यामध्ये ९०% वाढ झाल्याचेही पहायला मिळाले आहे. याचाच अर्थ पुणे रिअल इस्टेट मार्केटने गेल्या ४ वर्षांत त्यातही मागील वर्षी अभूतपूर्व कामगिरी केली आहे.”

२०१९ आणि २०२३ चा विचार केल्यास पुणे शहरात २०२३ मध्ये ९० हजारांहून अधिक घरांची विक्री झाली. याचाच अर्थ कोविड पूर्व काळाच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीतच घरांची विक्री हे ४०% नी वाढली आहे. याबरोबरच पुण्यात २०२३ च्या तुलनेत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही ६३ लाख असून २०१९ शी तुलना करता ती तब्बल ३७% नी जास्त असल्याचे समोर आले आहे. यावरून असे लक्षात येते की घरांचा सरासरी आकार आणि किंमत या दोन्ही गोष्टी वाढत आहेत. शिवाय २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये १ कोटी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत २५०% इतकी वाढ झाली आहे, अशी माहितीही नाईकनवरे यांनी दिली.

२०२४ या येत्या नवीन वर्षांत देखील बांधकाम व्यवसाय क्षेत्राची ही घोडदौड कायम राहील असा अंदाज असून पुण्याचा विचार केल्यास मोठ्या घरांची मागणी वाढती असली तरी मध्यम आकाराची, परवडणाऱ्या किंमतीतील घरांची मागणी देखील मागील २- ३ महिन्यांत पूर्वपदावर आल्याचे पाहायला मिळत आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा आणि अॅमेनीटीज असलेल्या गृहप्रकल्पांना ग्राहकांची पसंती असल्याचे नाईकनवरे यांनी नमूद केले.

बांधकाम व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आलेल्या नियमनांमुळे भारतीय नागरिकत्व असलेले परदेशातील नागरिक, परदेशी नागरिकत्व असलेले भारतीय नागरिक यांकडून गुंतवणूकीच्या दृष्टीने सकारात्मकता पाहायला मिळत आहे असे सांगत रणजीत नाईकनवरे म्हणाले, “थेट परकीय गुंतवणूक, पर्यायी गुंतवणूक निधी आणि अंशात्मक गुंतवणूक यांमुळे अनेक संधी बांधकाम व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होताना दिसत आहेत. मागील काही वर्षांत या क्षेत्रावर असलेला सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास पुन:प्रस्थापित होत असताना को वर्किंग, को लिव्हिंग, वेअरहाऊसिंग, प्लॉटिंग, सेकंड होम्स आणि भाडेतत्त्वावर जागा देण्याच्या दृष्टीने होणारी गुंतवणूक यामध्ये देखील वाढ होईल असा अंदाज आहे. शहरात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पामुळे मध्य भागात आणि मेट्रो मार्गिकेच्या आजूबाजूला असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळत आहे. त्यामुळे सध्या चालू वर्षांत पुण्यात विक्री होत असलेल्या ९० हजार ते १ लाख घरांची विक्री भविष्यात देखील कायम राहील असा आमचा अंदाज आहे.”

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत