मोठा उलटफेर! आयर्लंडने इंग्लंडचा उडवला धुव्वा, जिंकला टी२० विश्वचषक सामना

T20 World Cup: साखळी फेरीनंतर टी२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ फेरीची सुरुवात झाली आहे. या फेरीत आयर्लंडच्या संघाने कमालीचा खेळ दाखवला आहे. काल (२६ ऑक्टोबर) मेलबर्न येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात आयर्लंडने विजयी फटाका फोडला आहे. पावसाचा व्यत्यय आल्याने डीएलएस मेथडनुसार आयर्लंडने ५ धावांनी हा सामना जिंकला आहे. आयर्लंडसाठी हा मोठा विजय ठरला असून इंग्लंडची मात्र नाचक्की झाली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा संघ १९.२ षटकात १५७ धावांवर गुंडाळला गेला. आयर्लंडकडून अँड्र्यू बालबिर्नीने कर्णधार खेळी केली. त्याने ४७ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची शानदार खेळी केली. तसेच यष्टीरक्षक लॉरकन टकरने ३४ धावांचे योगदान दिले. इंग्लंडचे गोलंदाज मार्क वूड, लियाम लिविंगस्टोन आणि सॅम करन यांच्या भेदक माऱ्यामुळे आयर्लंडचा संघ १९.२ षटकातच गुंडाळला गेला.

मात्र प्रत्युत्तरात आयर्लंडच्या गोलंदाजांनीही दमदार प्रदर्शन केले. जोशुआ लिटलने ३ षटकात केवळ १६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच जॉर्ज डॉकरेल, फ्लॉन हँड आणि बॅरी मॅककार्थी यांनीही चांगले योगदान दिले. त्यांच्या अप्रतिम स्पेलमुळे इंग्लंडचा संघ १४.३ षटकात १०५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यादरम्यान त्यांनी ५ विकेट्सही गमावल्या. इंग्लंडकडून डेविड मिलर सर्वाधिक ३५ धावा करू शकला. आयर्लंडचा कर्णधार बालबिर्नीला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.