दारूच्या नशेत संजय राऊतांचा नंबर कसा मिळाला? फडणवीसांच्या विधानावर सुनील राऊतांचा थेट सवाल

नवी दिल्ली- खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आणखी एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘मी तुला सिद्धू मूसेवाला सारखा मारेन’ असा मेसेज केला होता. यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

‘जर तू दिल्लीत सापडलास तर तुला AK47 ने उडवून देईन, सिद्धू मूसेवालासारखा मर्डर केस होईल’, सलमान आणि तू फिक्स आहेस’, असे लिहित लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तो मजकूर संदेश म्हणून प्राप्त झाला आहे. यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर असून पुण्यातून एकाला अटक केली आहे.

दरम्यान याप्रकरणावर बोलताना संजय राऊत यांना धमकी देणारा दारूच्या नशेत होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. याबाबत विचारले असता संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) म्हणाले, “दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाइल नंबर कसा मिळाला? महाराष्ट्रात भरपूर लोक आणि नेते आहेत. मग त्याने संजय राऊत यांनाच धमकी का दिली? सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार पुण्यात सापडले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही गोष्टी गंभीररीत्या घेत प्रामाणिक कारवाई करावी.” ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.