PBKS vs KKR : पावसाच्या व्यत्ययामुळे डीएलएस मेथडनुसार लागला निकाल, पंजाबने ७ धावांनी जिंकला सामना

मोहाली- पंजाब किंग्जच्या होम ग्राउंडवर शनिवारी (१ एप्रिल) आयपीएल २०२३चा दुसरा सामना (PBKS vs KKR) झाला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १९१ धावांचा डोंगर उभा केला. परिणामी कोलकात्याला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाले. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने १६ षटकात ७ बाद १४६ धावा केल्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डीएलएस मेथजनुसार सामन्याचा निकाल लावण्यात आला, ज्यात पंजाने ७ धावांनी विजय मिळवला.

पंजाबच्या १९२ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाज विशेष प्रदर्शन करू शकले नाहीत. अष्टपैलू आंद्रे रसेलने १९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तसेच वेंकटेश अय्यरने ३४ आणि कर्णधान नितीश राणाने २४ धावा केल्या. या डावात पंजाबकडून युवा अर्शदीप सिंगने विशेष गोलंदाजी केली. त्याने ३ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १९ धावा देत ३ विकेट्स काढल्या.

तत्पूर्वी पहिल्या डावात पंजाबकडून भानुका राजपक्षेने धुव्वादार खेळी केली. केवळ ३२ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने झटपट अर्धशतक ठोकले. त्याच्या साथीला कर्णधार शिखर धवनने ४० धावांची आक्रमक खेळी केली. शिवाय अष्टपैलू सॅम करननेही २६ धावा जोडल्या. या डावात कोलकाताकडून टीम साउथीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच अनुभवी उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला पव्हेलियनला धाडले.