के.एल राहुलच्या पुनरागमनमुळे इंडीज विरूद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

मुंबई : भारतीय संघ आज अहमदाबाद येथे वेस्ट इंडीज विरूद्ध एकदिवसीय मालिका विजयाच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आहे. सलामीवीर फलंदाज के.एल.राहुलचं पुनरागमन झाल्याने इशान किशानला संघाबाहेर राहावं लागण्याची शक्यता आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाकडे १-० अशी विजयी आघाडी आहे. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात धमाकेदार ६० धावांची खेळी साकारली होती. त्याच्या सोबत इशान किशनने देखील आपली भूमिका चोख बजावली होती. मधल्या फळीत विराट कोहली अजूनही धावा काढण्यासाठी झुंजत आहे. तर विकेटकिपर रिषभ पंतची बँट देखील धावा काढण्यात अपयशी ठरत आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यांच्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत दिपक हुड्डाने मागील सामन्यात ३२ चेंडूत २६ धावांची विजयी खेळी साकारली होती. त्याच्या जोडीला सुर्यकुमार यादवनेही ३६ चेंडूत ३४ धावा काढून नाबाद राहिला. या सामन्यात देखील या दोघांकडून संघाला मोठ्या धावांची अपेक्षा आहे. फिरकी गोलंदाज यजुर्वेंद्र चहलने आपल्या फिरकीवर इंडीजच्या फलंदाजाच्या भंबेऱ्या उडवल्या होत्या. त्याने ४ फलंदाजांना बाद केल्याने त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला होता. तर वाँशिग्टन सुंदरनेही सुंदर गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या फलंदाजाना झगडायला लावलं होतं.

मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कुष्णा आणि शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांवर भारताची भिस्त असणार आहे. त्यांनी देखील आपल्या गोलंदाजीचा नजराणा पेश केला होता. त्यामुळे वेस्ट इंडीज संघाला केवळ १७६ धावा निघाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार के.एल. राहुल आगामी विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून संघाची बांधणी करत आहे. त्यामुळे के.एल.राहुलच्या पुनरागमन झाल्याने कुणाला संघाबाहेर राहवं लागणार आहे, ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.