मला धक्का बसलाय, काही सूचत नाही…’, शिंदे गटाला शिवसेना नाव-चिन्ह मिळाल्यावर सुप्रियाताईंची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राजकारणात उलथापालथ झाली आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नाव दिले आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackera) मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.

या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयानंतर थेट आणीबाणीच्या कालखंडाची आठवण झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खंत व्यक्त करीत आणीबाणीची आठवण करून दिली. तसेच केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त असूनही असा निर्णय कसा देऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सुळे म्हणाल्या, “मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. आणीबाणीवेळी मी खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सूचत नाही”, असे म्हणत त्यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगितले.