पवारांवर टीका होऊ लागताच मराठा युवकांची माथी शिंदेसरकार भडकवत असल्याचा राष्ट्रवादीने केला आरोप

मुंबई – मराठा युवा सेनेच्या काही तरुण पदाधिकार्‍यांची माथी भडकवण्याचे पाप शिंदेसरकार करत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम शिंदेसरकार करत आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

अंकुश कदम या मराठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यात पवारसाहेबांनी तरुणांसाठी काय केले हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर महेश तपासे यांनी त्याच्या व्हिडीओचा अजिबात राग नाही परंतु अंकुश कदमाचे जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा जास्त सामाजिक, राजकीय कारकिर्द आदरणीय शरद पवारसाहेबांची आहे याची आठवण करून दिली आहे.

राज्यात युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीयाबाबतचे धोरण असो खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुढाकार घेऊन समाजात आदरयुक्त स्थान मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत. काम करतात म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे यांना सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे एवढी तरी माहिती अंकुश कदमने घ्यावी असे जाहीर आवाहन महेश तपासे यांनी केले.