‘सैराट’मधील प्रिन्सला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

नगर –  प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Famous director Nagraj Manjule) यांचा सैराट या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सूरज पवार(प्रिन्स) (suraj pawar) हा अडचणीत सापडला आहे. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तीला फसवल्याचा आरोप सूरजवर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रसारमाध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगत शिर्डीतील एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सूरजने नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष दोन जणांनी दिलं होतं. यासाठी त्यांच्याकडून ५ लाखांची मागणीही करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला २ लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. महेश हे पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे गेले असता त्यांना आपली फसवणूक होत असल्याची समजले. त्यानंतर त्यांनी रितसर अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( दोघेही राहणार संगमनेर ) अशा तीन जणाांना अटक करण्यात आली आहे.