फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट, महाराष्ट्राची लावली वाट; महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक…

मुंबई – ‘बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट,महाराष्ट्राची लावली वाट’ … ‘पन्नास खोके, एकदम ओके’ …अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (MVA) आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सोळावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने करत सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘बिरबलाची खिचडी’ म्हणून चूल मांडून शिंदे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमकपणे आंदोलन करत असताना सत्ताधारीही आंदोलन करु लागले मात्र ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधार्‍यांच्या आंदोलनाची हवाच निघून गेली. आपल्याला माध्यमात जागा मिळत नाहीय हे लक्षात येता कुरघोडी करत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या समोर येऊन सत्ताधारी आंदोलन करत माध्यमांचे लक्ष वेधून घेत होते मात्र तरीही ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधाऱ्यांची गोची झाली. मात्र माध्यमांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनालाच जास्त महत्व दिल्याचे पाहायला मिळाले.