राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ

सुवर्णपदकास १ कोटी, रौप्य ७५ लाख, कांस्य ५० लाख रुपये पारितोषिक देवून खेळाडूंना गौरविण्यात येणार. राज्य सरकारकडून पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये

Sanjay Bansode  – राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेत्या खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे (Sports and Youth Welfare Minister Sanjay Bansode) यांनी दिली.

१९ व्या चीन येथील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस १ कोटी रूपये,मार्गदर्शकास १० लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूसाठी ७५ लाख रूपये,मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार रुपये, कांस्यपदक प्राप्त खेळाडूला ५० लाख रुपये ,मार्गदर्शकास ५ लाख रुपये रोख असे बक्षिस देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूला ७५ लाख,मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार ,रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख,मार्गदर्शकास ५ लाख तर कांस्यपदक विजेत्याला २५ लाख ,मार्गदर्शकास २ लाख ५० हजार देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे संजय बनसोडे यांनी सांगितले.

यापुर्वी सुवर्णपदकासाठी १० लाख, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार, रौप्यपदकासाठी ७.५ लाख,मार्गदर्शकास १ लाख ८७ हजार , कांस्यपदकासाठी ५ लाख,मार्गदर्शक १ लाख २५ हजार रुपये दिले जात होते. मात्र आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी करुन जागतिक स्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असेही संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आठ दिवसापुर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाब, हरियाणा ,मध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा करण्यात आली होती, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=_O7XOEdnngI

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर