केंद्र सरकारनं घेतला यावर्षी कांद्याचा राखीव साठा 5 लाख मेट्रीक टन इतका करण्याचा निर्णय

केंद्र सरकारनं अनपेक्षितरित्या यावर्षी कांद्याचा राखीव साठा 5 लाख मेट्रीक टन इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी 3 लाख मेट्रीक टन कांद्याचा साठा करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं होतं. नव्या निर्णयानुसार राष्ट्रीय सहकारी ग्राहक महामंडळ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महामंडळ अर्थात नाफेडला प्रत्येकी एक लाख टन मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचे आदेश ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. तसंच खरेदी केलेला कांदा मोठ्या ग्राहक केंद्रांवर नियोजनबद्ध पद्धतीनं वितरित करण्याचे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत.

दरम्यान, देशातील कांद्याची स्थिती म्हणजेच मागणी आणि पुरवठा बघूनच केंद्र सरकारनं निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेतला असावा. सरकारला शेतकरी आणि देशातील नागरिक असं दोघांचं हित बघावं लागतं असं मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार (Bharti Pawar) यांनी काल नाशिक इथं बातमीदारांशी बोलताना व्यक्त केलं.