मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं की पाटणकर, जाधव, सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?

मुंबई – काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाटल्यास मला तुरुंगात टाका, पण १९९२ च्या दंगलीवेळी मुंबईला वाचवणाऱ्या शिवसैनिकांना छळू नका, असे आव्हानही भाजपाला दिले. आता याच मुद्द्यावरुन भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, मुंबईतील दंग्यात वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका मला अटक कराअसे छातीठोक सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कृपया सांगावे की पाटणकर , यशवंत जाधव  प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकराना वाचवत होते?  मुळात बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊदशी मालमत्ता घेणाऱ्या नबाबच समर्थन आपण करत आहात असं देखील उपाध्ये यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नुकतीच ईडीनं मोठी कारवाई करत उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीनं थेट ही कारवाई केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.