राजकीय दंगे भडकवून सत्तेत येण्याचा कट, नेत्याचं कॉल रेकॉर्डिंग समोर; भाजपा नेत्याचा दावा

पुणे– नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांच्या विरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या कथित घटने संदर्भात विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी गंभीर आरोप केला आहे.

पुणे शहरात एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहे, ज्यामध्ये तो राजकीय दंगे भडकवा, असे म्हणत आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

राज्यात काही ठिकाणी दंगे भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. अशी माहिती गृह विभागाला मिळाली आहे. याबाबत पुण्यात एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यामध्ये तो म्हणाला आहे की, राजकीय दंगे भडकवा. काही लोकांचा असे दंगे भडकून सत्तेत येण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.